नवी मुंबई - मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यामुळे नवी मुंबईमधील माथाडी कामगारांसह सकल मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असून आरक्षणाचे यश चळवळीतील हुतात्म्यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया चळवळीतील शिलेदारांनी व्यक्त केली आहे.माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी चार दशकांपूर्वी मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला. राज्यभर आंदोलने सुरू केली. १९८२ मध्ये विधानसभेवर निर्णायक मोर्चा काढला. आरक्षण जाहीर केले नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही असा इशारा सरकारला दिला. सरकारने निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी समाजासाठी हौतात्म्य पत्करले. यानंतरही आरक्षणासाठी लढा सुरू झाला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो नागरिकांनी मूक मोर्चा काढला. आरक्षण जाहीर होत नसल्यामुळे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनही केले. यानंतर सरकारने आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरविल्यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी समाजासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्यानंतरही आरक्षणासाठी अनेक शहीद झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर हा विजय त्या सर्व शहिदांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईमधील मान्यवरांनी व्यक्त केली.आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये नवी मुंबईकरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोकणभवनवर काढलेल्या मोर्चामध्ये शहरातील लाखो नागरिक सहभागी झाले होते. मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चासाठी राज्यातून आलेल्या आंदोलकांच्या राहण्याची सोयही येथे करण्यात आली होती. यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांनी आनंद व्यक्त केला.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचे सार्थक झाले. जे दोन ते तीन टक्के आरक्षण कमी होत आहे त्यासाठीही सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरू राहील. हे यश मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात शहीद झालेल्यांना समर्पित करत आहोत.- अंकुश कदम, मराठा क्रांतीमोर्चा, महाराष्ट्र समन्वयकमराठा आरक्षणाची चळवळ माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली. त्यांच्या लढ्याला आज यश आले आहे. त्यांच्या विचाराचा व दूरदृष्टीचा विजय असून आजचा निर्णय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.- संतोष आहिरे, माथाडी प्रतिनिधीमराठा आरक्षण कायदा वैध ठरल्यामुळे समाजामधील कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संविधानाच्या तरतुदीनुसार मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत मागास राहिलेला समाजातील घटक प्रवाहात येणे शक्य होईल. - गणेश ढोकळे-पाटील, समन्वयक मराठा क्रांती मोर्चासर्वांना आनंद झाला आहे. आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लाखो नागरिकांनी मूक मोर्चा काढला. लढ्यामध्ये प्रत्येकाने त्याच्या क्षमतेमुळे योगदान दिले. न्यायालयाने आरक्षण वैध ठरविल्यामुळे साहजिकच सर्वांना आनंद झाला असून आतापर्यंतच्या लढ्यात शहीद झालेल्यांना हा विजय समर्पित आहे.- प्रशांत सोळसकर,नेरूळआरक्षणासाठी प्रत्येक घरातील व्यक्ती आंदोलनात सहभागी झाली होती. या लढ्यामुळे सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध ठरविल्यामुळे सर्वांना आनंद होत आहे. आता याची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी.- मिलिंद सूर्याराव, समन्वयक मराठा,क्रांती मोर्चामराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्यामध्ये प्रत्येक नागरिकाने योगदान दिले होते. या लढ्याला यश आले असून आरक्षणामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळेल. आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करावी ही विनंती.- जितेंद्र रौंदळे, बेलापूर
माथाडींसह मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:32 AM