उरणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:56 AM2019-04-17T05:56:12+5:302019-04-17T05:56:22+5:30
कळंबुसरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलींवरच स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या सभापतीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
उरण : कळंबुसरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलींवरच स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या सभापतीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून नारायण पाटील (४२) याला अटक केली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ व पालकांनी मुख्याध्यापकांंना घेराव घातला.
उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेण्याची व्यवस्था असलेल्या या शाळेत ८० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये ३८ मुलींचा समावेश आहे.
१३ एप्रिल रोजी शालेय शिक्षण समितीचा सभापती नारायण पाटील याने दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. याबाबत जाब विचारण्यासाठी पीडितेचे पालक पाटील यांच्या घरी गेले असता त्यांनी दमदाटी करीत हुसकावून लावले. अखेर मुलीच्या आईने सोमवार, १५ एप्रिल रोजी उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.
उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी
तक्रारीची दखल घेत पाटील यांना पॉक्सो व विविध कलमांखाली अटक केली. याआधीही पाटीलने आठ ते दहा मुलींवर अत्याचार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
>मुख्याध्यापकांना घातला घेराव!
शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता खुंटले अन्य शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी मुख्याध्यापकांंना घेराव घातला.