नवी मुंबई : ट्युरिस्ट व मेडिकल व्हिजावर भारतात आल्यानंतर परत न जाता ओळख लपवून राहणाऱ्या दोन दांपत्यांना बांग्लादेशींना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले आहे. मागील दहा वर्षात अनेकदा घुसखोरी मार्गाने भारतात ये जा केल्यानंतर त्याने पनवेलमध्ये स्वतःचे आधारकार्ड देखील बनवून घेतले आहे.
खारघरच्या बेलपाडा परिसरात घुसखोर बांग्लादेशी राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बेलपाडा परिसरात शोधमोहीम राबवली. त्यामध्ये एका ठिकाणावरून मोहम्मद जिनत शेख व सुमोन सलीम या दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघेही बांग्लादेशी असून त्यांच्या पत्नी देखील बांग्लादेशी असून सर्वजण घुसखोरी करून भारतात आल्याची कबुली दिली. त्यापैकी मोहम्मद याचा सहा वर्षाचा मुलगा देखील त्यांच्यासोबत राहत आहे.
दहा वर्षांपूर्वी मोहम्मद हा पहिल्यांदा घुसखोरी करून भारतात आल्यानंतर अनेक दिवस पनवेलमध्ये राहायला होता. त्याठिकाणी त्याने स्वतःचे आधार कार्ड देखील बनवून घेतले आहे. यानंतर तो अनेकदा घुसखोरी मार्गाने बांग्लादेशला ये जा करायचा. त्याठिकाणी त्याने स्वतःचे पासपोर्ट देखील बनवून घेतले होते. त्याद्वारे देखील तो अधून मधून भारतात ट्युरिस्ट तसेच मेडिकल व्हिजावर भारतात यायचा. वर्षभरापूर्वी तो मेडिकल व्हिजावर आला असता पुन्हा परत गेला नसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध घेतला असता दुसरे दाम्पत्य देखील त्याच्यासह आढळून आले. या सर्वांवर खारघर पोलिस ठाण्यात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना पनवेल व बेलपाडा परिसरात भाड्याने आश्रय देणाऱ्या घर मालकांवर देखील कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.