नवी मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी वाशी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईतील विवेक-विचार मंचच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकावर निषेध व्यक्त करण्यात आला.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे लेखणीवर घात झाल्याचा असंतोष व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मूलन समिती, वाशीतील साहित्य मंदिर, चर्मकार संघटना, नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कल, पत्रकार संघटना तसेच शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याकरिता आयोजित सभेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.निषेध सभेत बोलताना २०१३ पासून ते आतापर्यंत २२ पत्रकारांवर हल्ला झाल्याची माहिती अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम यांनी दिली. परखडपणे बोलणाºया व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मगदूम यांनी स्पष्ट केले. अशा घटना पाहून लोकशाहीचा अंत होत असल्याची नाराजी नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत यांनी व्यक्त केली. तसेच महिला पत्रकारावर झालेला हल्ल्याचा हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो की काय असेच भीतीचे वातावरण पत्रकारांमध्ये पसरल्याचे वक्तव्य पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले. मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. या घटनेबाबतची सर्वतोपरी चौकशी केली जाऊन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली.गौरी लंकेश यांचे बलिदान वाया जाणार नाही असे म्हणत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध सभेत अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम, नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत, ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम, कवी साहेबराव ठाणगे-पाटील, मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, वाशीत निषेध सभा : आरोपींचा शोध घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:20 AM