नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या तृतीयपंथींना हटकल्याने त्यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एपीएमसी मधील पुनीत कॉर्नर इमारतीलगत मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच तृतीयपंथींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
एपीएमसी पोलिसांकडून परिसरात रात्रगस्त सुरु असताना हा प्रकार घडला आहे. माथाडी चौक येथून पुनीत कॉर्नर इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरून बिट मार्शल पोलिस हवालदार विजय सावंत व भगवान गायकर हे कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना रस्त्यालगत दोन तृतीयपंथी संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी त्यांना तिथे न थांबण्याचा इशारा दिला असता तृतीयपंथींनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्याचवेळी एका तृतीयपंथीने फोन करून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलवले असता काही वेळातच तिथे आलेल्या इतर तिघांनी लाकडी दांडक्याने दोन्ही पोलिसांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे सावंत व गायकर यांनी त्यांना प्रतिकार करत पोलिस ठाण्यातून मदत बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वजण पळू लागले असता दोघांनी इतर नागरिकांच्या मदतीने दोन तृतीयपंथींना पकडून ठेवले.
पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांचे नाव नेहा उर्फ राम पांडे व दीक्षा श्रीराम असल्याचे सांगितले. पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी या दोन तृतीयपंथींसह त्यांच्या इतर तीन साथीदारांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत कॉर्नर परिसरात लांबच्या मार्गावरील ट्रक चालकाची ये जा असल्याचे हेरून त्याठिकाणी देहविक्रीसाठी हे तृतीयपंथी थांबले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पामबीच मार्गावर कोपरी येथून बोनकोडे कडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल लगत देखील रात्रीच्यावेळी तृतीयपंथी थांबलेले असतात. त्यामुळे त्यांचे अवैध कृत्याचे अड्डे पोलिसांकडून वेळीच उध्वस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.