नवी मुंबई : मागील दोन वर्षांत एनएमएमटी कर्मचाºयांवरील हल्ल्याच्या ८८ घटना घडल्या आहेत. त्यामुळे किरकोळ कारणावरून प्रवासी तसेच इतरांकडून होणाºया हल्ल्यांच्या घटनांमुळे चालक-वाहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे असे हल्ले करणाºयांवर कठोर कारवाईची मागणी परिवहन विभागाकडून पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.प्रवाशाने पैशाच्या वादातून एनएमएमटीच्या वाहकावर ब्लेडने वार केल्याची घटना नुकतीच पनवेलमध्ये घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वाहकाचे थोडक्यात प्राण वाचले आहेत. मात्र या घटनेनंतर एनएमएमटीच्या कर्मचाºयांमध्ये कर्तव्यावर असताना दडपण निर्माण झाले आहे. कोणत्याही कारणावरून आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची भीती त्यांना सतावत आहे. दोन वर्षांपूर्वी घणसोली येथे रिक्षाचालकाकडून एनएमएमटीच्या चालक व वाहकावर जीवघेणा हल्ला झाला होता. तर डेपोतून बस बाहेर काढत असताना आडव्या आलेल्या रिक्षाचालकाला जाब विचारल्याने त्याने एनएमएमटीच्या चालकासह वाहकाला जबर मारहाण केल्याचीही घटना कोपरखैरणेत काही महिन्यांपूर्वी घडली होती. अशा प्रकारे अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून एनएमएमटीच्या चालक अथवा वाहकांना मारहाण केल्याच्या ८८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये गतवर्षात ५६ घटना घडल्या असून चालू वर्षात अद्यापपर्यंत ३२ घटना घडल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन विभागाने पोलीस आयुक्त संजय कुमार यांना लेखी निवेदन दिले आहे. त्याद्वारे एनएमएमटीच्या कर्मचाºयांवर हल्ले करणाºयांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.सद्य:स्थितीला एनएमएमटी चालक अथवा वाहकांचे इतरांसोबर वाद होण्याच्या कारणांमध्ये वाहतुकीतला अडथळा हे मुख्य कारण ठरत आहे. आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एनएमएमटीच्या बस थांब्यांवरच रिक्षाचालकांनी अवैध कब्जा मिळवला आहे. यासंदर्भात परिवहन विभागाकडून अनेकदा तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कारवाईचा धाक दाखवून रिक्षाचालकांना शिस्त लावण्यात वाहतूक पोलीस व आरटीओ अपयशी ठरले आहे. परिणामी, बस थांब्यांवर तसेच संपूर्ण रस्त्यांवर रिक्षाचालकांकडून हक्क गाजवला जात आहे. बेशिस्तपणे रिक्षा चालवणे, प्रवासी मिळविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी रिक्षा थांबवणे असे प्रकार सर्रासपणे शहरात पाहायला मिळत आहे. यामुळे एनएमएमटीच्या मार्गात अडथळा होत असून, रिक्षाचालकांच्या घोळक्यातून मार्ग काढत त्यांना बस चालवाव्या लागत आहेत. अशावेळी इतर वाहनांसोबत छोटे-मोठे अपघात झाल्यासदेखील वाद उद्भवून त्यांच्यावर हल्ल्याचे प्रकार होत आहेत. तर काही प्रकरणांमध्ये एनएमएमटीच्या कर्मचाºयांनादेखील शिस्तीचे धडे देणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा कर्मचाºयांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानेही वादाचे प्रकार घडत आहेत. त्यानुसार परिवहनकडून कर्मचाºयांसाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत.
एनएमएमटी कर्मचाऱ्यांवर हल्ले; दोन वर्षांत ८८ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:29 AM