पनवेल : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आंतरराष्ट्रीय संघटना हस्तक्षेप करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. यासंदर्भात त्यांनी शिख्स फॉर जस्टीस या न्यूयॉर्क स्थित संघटनेने चीनचे राष्ट्रपती जिन पिंग यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला आहे. सोमवार १४ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी संवाद साधताना माधव भंडारी म्हणाले की, देशातील शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी व त्यांना शेतीमालाची विक्री कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर केले असल्याचे नमूद केले. पंजाबात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून केंद्र सरकार चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने अनेकदा चर्चेचे प्रस्ताव पाठवले. प्रत्यक्ष चर्चेत संघटनांच्या नेत्यांच्या मनात असलेल्या शंका दूर व्हाव्यात यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांबरोबर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहणार आहे. शेतकरी त्याच्या पसंतीनुसार आपला शेतीमाल कोठेही विकू शकेल. तसेच कॉन्ट्रॅक्ट शेतीबाबतचे गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत. असे असताना कायदे रद्दच करा या मागणीवर संघटनांचे नेते अडून बसले आहेत. या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत, असे आता दिसू लागले आहे, असेही त्यांनी नमूद केले. पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात शांतता भंगाचा प्रयत्न; माधव भंडारी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:52 AM