मोबाइल विश्वातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न; सीवूडमध्ये ‘खेळ खेळू बालपणीचे’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:45 PM2020-01-12T23:45:12+5:302020-01-12T23:45:19+5:30
संस्कार फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने नुकतेच या उपक्रमाचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : मोबाइलच्या विश्वातून समाजाला बाहेर काढण्यासाठी सीवूडमध्ये ‘खेळ खेळू या बालपणीचे’ उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमास लहान मुलांसह ज्येष्ठांनीही चांगला प्रतिसाद दिला.
संस्कार फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने नुकतेच या उपक्रमाचे आयोजन केले होते. रस्सीखेच, विटी दांडू, पिलो पासिंग, बटाटा शर्यत, सापशिडी, मटका फोडी, कलर गेम, लगोरी, चमचा गोटी, टिकली लावणे, बादलीत बॉल टाकणे, भोवरा फिरवणे, तळ्यात मळ्यात व इतर खेळांचा यामध्ये समावेश होतो. सद्य:स्थितीमध्ये लहान मुलांसह घरातील बहुतांश सदस्य मोबाइलच्या विश्वात रमलेले दिसतात. प्रत्यक्षात मैदानामध्ये जाऊन खेळण्यापेक्षा मोबाइलवरच विविध खेळ खेळण्यास प्राधान्य दिले जात आहे. लहान मुलांना बालपणीच्या खेळांचा प्रत्यक्ष मैदानात जाऊन आनंद घेता येत नाही. यामुळेच य उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामध्ये सीवूड परिसरातील लहान मुले व पालकही सहभागी झाले होते.
लहान मुलांना मैदानात जाऊन विविध खेळ खेळता यावेत व पालकांना त्यांच्या बालपणीच्या दिवसाची आठवण व्हावी, यासाठी राबविलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया आयोजक समीर बागवान यांनी दिली. या वेळी उपविभागप्रमुख राजेंद्र मोकल, शाखाप्रमुख गणेश कांबळे, जितेंद्र कोंडस्कर, वीणा महाडेश्वर, मुबीन काझी, सुरेश माळवे, प्रकाश राणे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.