नोकरीच्या बहाण्याने मुलींना लुटणारा अटकेत
By Admin | Published: August 19, 2015 02:21 AM2015-08-19T02:21:52+5:302015-08-19T02:21:52+5:30
नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावलेल्या मुलींना लुटणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन म्हात्रे (२६) असे त्याचे नाव असून तो
नवी मुंबई : नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावलेल्या मुलींना लुटणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन म्हात्रे (२६) असे त्याचे नाव असून तो उरणचा रहिवासी आहे. यापूर्वी तो नोकरीच्या जाहिरातींमुळे फसला आहे. स्वत:च्या अनुभवातून त्याने ही शक्कल लढवली.
सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर नोकरीच्या जाहिराती झळकत असतात. त्यांना अनेकजण भुलतात. नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले जातात आणि नोकरी मिळत नाही. अशा फसवणुकीनंतर सावध होण्याऐवजी सचिनने याचाच गैरवापर सुरू केला. कामासाठी मुली पाहिजे असल्याची पत्रके छापून त्यावर संपर्कासाठी स्वत:चा मोबाइल नंबर लिहिला. ही पत्रके पनवेल, उरण परिसरांत चिकटवली. संपर्क साधणाऱ्या मुलींना वाशी रेल्वेस्थानक परिसरात तो बोलवायचा. त्यांचे मोबाइल, सोन्याची चेन घेऊन पळून जायचा. जुलैपासून त्याने नीलिमा शेडगे हिच्यासह चौघींना लुटल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व निरीक्षक सुरज पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस शिपाई सचिन खेडकर, चेतन पाटील, संदीप पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते. यादरम्यान म्हात्रे वापरत असलेले काही मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागले. परंतु ते सर्व नंबर फसवणूक झालेल्या मुलींचे होते. मुलींकडून मोबाइल चोरल्यानंतर त्यांचा वापर इतर मुलींना फसवण्यासाठी तो करत होता. अखेर वाशी पोलिसांच्या तपास पथकाने त्याला उरण येथून अटक केली. सचिन म्हात्रेचे आवरे गावात चायनीजचे दुकान असून तो अर्धवेळ नोकरीच्या शोधात होता. (प्रतिनिधी)