नवी मुंबई : बनावट शिधावाटप पत्रिकेद्वारे अटकेतील आरोपीला जामीन मिळवून देऊन सोडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीबीडी येथील वाशी न्यायालयात घडली आहे. जामिनाच्या प्रक्रियेवेळी न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे बनावट साक्षीदार गोंधळल्याने हा प्रकार उघड झाला. मात्र यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने त्याने कोर्टातून पळ काढला.
नेरुळ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या अजगर शेख याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वाशी न्यायालयात शनिवारी सुनावणी होणार होती. यासाठी शेख याचे वकील व साक्षीदार दाम्पत्य देखील त्याठिकाणी हजर होते. यावेळी साक्षीदारांनी दिलेल्या शिधापत्रिकेवर न्यायाधीशांना संशय आल्याने त्यांनी सविता हिवाळे हिच्याकडे शिधापत्रिकेवरील नावाबाबत चौकशी केली. त्यावेळी शिधापत्रिकेबाबत पती राजेंद्र हिवाळे यांना माहिती असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार न्यायाधीशांनी राजेंद्र याच्याकडे विचारणा केली असता, तो गोंधळला. यानंतर त्याने लघुशंकेच्या बहाण्याने दहाव्या कोर्टाच्या कक्षातून बाहेर निघून न्यायालयाच्या इमारतीमधून पळ काढला.
यावेळी पोलिसांनी शोध घेऊनही तो हाती लागला नाही. त्यानुसार बनावट कागदपत्रद्वारे न्यायालयाची फसवणूक करून आरोपीला जामिनावर सोडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजेंद्र छबू हिवाळे याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शिधापत्रिकेवरील पत्यानुसार चेंबूरचा राहणारा असून याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.