नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास १४ वर्षीय मुलीला आश्रय देण्याच्या बहाण्याने घरी नेवून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मित्राला भेटण्यासाठी हि मुलगी घराबाहेर आली असता भावाच्या भीतीने ती नेरूळला गेली होती. त्याठिकाणी एका चायनीस सेंटर चालकाने तिला रात्रीसाठी आश्रय देतो सांगून घरी नेले होते. मात्र त्याने दरवाजा लावून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच तिने प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली.
तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर मुलगी शनिवारी रात्री तुर्भे रेल्वेस्थानक येथे मित्राला भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिचा भाऊ तिला शोधत त्याठिकाणी येत असल्याचे तिला मित्रांनी सांगितले. यामुळे ती कोपराला आली असता त्यातच ठिकाणी तिला उशीर झाला. तर रात्र झाल्याने घरी गेल्यास घरचे ओरडतील या भीतीने ती रिक्षाने नेरुळ गावात आली होती. त्याठिकाणी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका चायनीस सेंटरजवळ आली असता एका सुज्ञ व्यक्तीने तिला खायला देऊन तो निघून गेला. यानंतर चायनीस सेंटरवरील अनिरुद्ध मोहन्ती (३७) याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिला विश्वासात घेऊन आश्रय देतो सांगून जवळच असलेल्या त्याच्या घरी नेले. मात्र ती घरात झोपली असता तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला प्रतिकार करत तिथून पळ काढून वाशी गाठले होते.
दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक निलेश येवले, गणेश दळवी, हवालदार कांबळे, अझहर मिर्झा, गोपीचंद बेंडकुळे, सचिन पाटील आदींचे पथक केले होते. त्यांनी तांत्रिक दृष्ट्या केलेल्या तपासात ती वाशी रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार रविवारी पहाटे चारच्या सुमारास तिला तिथून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती सांगताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी काही तासातच अनिरुद्ध मोहन्ती याला अटक केली. अल्पवयीन मुलीने त्याच्या तावडीतून सुटका केल्याने अनर्थ टळला.