मधुकर ठाकूर
उरण : वाटसरुने दाखवलेली सतर्कता आणि ९ वर्षाच्या मुलीच्या प्रसंगावधान व धाडसामुळे अज्ञात अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका करून घेतल्याची घटना मंगळवारी (११) संध्याकाळी चिरनेर परिसरात घडली आहे. चिरनेर गावातील रहिवासी महादेव डोईफोडे हे मंगळवारी सायंकाळी ७-३० वाजताच्या सुमारास आपल्या दोन मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते.फेरफटका मारल्यानंतर मोठा मुलगा घरी परतला होता. तर वडिलांच्या मागून त्यांची ९ महिन्याची मुलगी देवश्री ही एकटीच चालत येत होती.मात्र महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असताना देवश्री मागून येताना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी माघारी फिरुन देवश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले दिसले.
दरम्यान, त्याच रस्त्यावरुन येणाऱ्या भरत जाधव यांना एक अज्ञात इसम देवश्रीला उचलून तीचे तोंड दाबून घेऊन जाताना दिसला. तो त्या मूलीचा बाप असा असा समज झाल्याने त्यांनी त्याकडे क्षणभर दुर्लक्ष केले.मात्र देवश्रीने " काका मला वाचवा " अशी हाक दिल्यानंतर क्षणातच काही तरी काळेबेरं असल्याची जाणीव जाधवांना झाली.देवश्रीच्या हाकेला प्रतिसाद देत जाधव यांनीही अज्ञात अपहरणकर्त्यांला मुलीला सोडण्यासाठी आवाज दिला.त्याच दरम्यान प्रसंगावधान राखून ९ वर्षीय देवश्रीने अपहरणकर्त्यां इसमाच्या हातावर जोरदार चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला.देवश्रीच्या धाडसामूळे व भरत जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांचा देवश्रीला पळविण्याचा प्रयत्न फसला आणि मुलगी सुखरूप आई वडिलांच्या कुशीत विसावली.
या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत अज्ञात अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . तक्रारीनंतर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासाला सुरूवात केली आहे. तसेच अज्ञात अपहरणकर्ता इसम हा आपल्या चारचाकी वाहनासह सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकारानंतर पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.