उरण: येथील द्रोणागिरी नोडमधील एम गोल्ड ज्वेलर्सवर ऐन दिवाळीच्या सणातच रिवाल्वरचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चार दाखलेबाज आरोपींना उरण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.
ऐन दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशीच द्रोणागिरी नोड, सेक्टर -५०,मॅजेस्टीक व्हीलामध्ये असलेल्या एम गोल्ड ज्वेलर्सवर रिवाल्वरचा धाक दाखवून चोरी करण्याची इरादयाने अज्ञात आरोपी आले होते. त्यांनी दुकानात जाऊन काम करणा-या मुलीस ‘‘ चुप बैठ,चुप बैठ’ असे दरडावल्याने दुकानात हजर असलेल्या मालकाने सायरन वाजविला. या सायरनच्या आवाजाने अज्ञात आरोपींनी घाबरून दुकानाबाहेर असलेल्या इनोवा कारमध्ये बसून पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उरण पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली होती.
उरण पोलिसांकडे कोणताही धागा नव्हता. मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीत चोरीच्या इरादयाने रिवाल्वर घेऊन आलेले इसम इनोवा कारमधून पळून गेला होते. त्या इनोव्हा कारचा मागोवा घेतला असता या अट्टल चार गुन्हेगारांचा सुगावा लागला. ही इन्होवा कार अंकुश अश्रुबा जाधव (४४) साकीनाका-मुंबई यांने भाड्याने घेऊन गुन्ह्यांसाठी वापरली होती.
त्यानंतर तपासात बिलाल अब्दुल करीम चौधरी (१९) रा.उल्हासनगर,शंकर बनारसी चौरासिया (५१) रा. वडाळा,एजाज अब्दुल करीम चौधरी, रा. उल्हासनगर आदी चार दाखलेबाज आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.