मुलीला शाळेतून पळवण्याचा प्रयत्न, आरोपीला ग्रामस्थांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:02 AM2020-02-20T01:02:00+5:302020-02-20T01:02:15+5:30

आरोपीला ग्रामस्थांचा चोप : कर्जत तालुक्यातील खांडसमधील घटना

Attempts to abduct the girl from school, the villagers silence the accused | मुलीला शाळेतून पळवण्याचा प्रयत्न, आरोपीला ग्रामस्थांचा चोप

मुलीला शाळेतून पळवण्याचा प्रयत्न, आरोपीला ग्रामस्थांचा चोप

Next

नेरळ : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना ताज्या असल्याने प्रत्येक जण सतर्क होत आहे. अशातच खांडस येथील शाळेच्या पटांगणात खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलीला एक व्यक्ती फूस लावून जंगलाच्या दिशेने घेऊन जात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. हे पाहताच आरडाओरडा केल्याने संबंधित व्यक्ती पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केल्याने काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कर्जत तालुक्यातील खांडस येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत खांडस व परिसरातील मुले प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी येतात. मंगळवार, १८ फे ब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता शाळा भरली. साधारण १२च्या सुमारास मधली सुट्टी झाली त्यावेळी शाळेच्या पटांगणात सर्व मुले पकडापकडी खेळत असताना या शाळेतील दुसऱ्या इयत्तेत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीवर येथून जवळच देशमुख फार्मवर कामाला असलेला विजय रमेश दबगडे हा लक्ष ठेवून होता. त्याला संधी मिळताच त्याने त्या विद्यार्थिनीकडे जाऊन माझ्यासोबत चल, तुला खाऊ देतो असे म्हणत तिला फूस लावून स्वत:सोबत येण्यास तयार केले. त्यानंतर तिला उचलून तो जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. मात्र तो जात असताना व सोबत कुणीतरी शाळेतली मुलगी आहे, हे दृश्य तेथील महिलांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी गावात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा गावातील इतर लोकांनी दबगडे याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तोवर आरोपी मुलीला घेऊन साधारण एक किमी गेलेला होता. गावातील लोक मागे लागल्याने त्याने मुलीला सोडून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांना पाचारण केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे हे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी विजय दबगडे याला ताब्यात घेतले. दबगडे काम करत असलेल्या देशमुख फार्मचे मालक त्याक्षणी तिथे आले व ग्रामस्थांबरोबर त्यांची बाचाबाची झाल्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण होते. पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांनी परिस्थिती शिताफीने हाताळत दबगडेला नेरळ पोलीस ठाण्यात आणले. ग्रामस्थ सतर्क असल्याने पुढील मोठा घडणारा अनर्थ टळला. मात्र आरोपीला कडक शासन व्हायला हवे याकरिता ग्रामस्थ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून होते. या घटनेची माहिती घेऊन व गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
 

Web Title: Attempts to abduct the girl from school, the villagers silence the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.