चळवळ संपवण्याचा होतोय प्रयत्न, आंबेडकरी संघटनांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:05 AM2018-01-15T01:05:20+5:302018-01-15T01:05:20+5:30
आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला.
नवी मुंबई : आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला. महाराष्टÑ बंदच्या दरम्यान आंदोलनात सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण हे त्रयस्थ व्यक्तींनी केलेले सूडबुद्धीचे राजकारण असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह नवी मुंबईतही ठिकठिकाणी भीमसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या दरम्यान, एपीएमसीमधील दोन गटांतील वाद व रबाळेतील हाणामारी वगळता इतर कुठे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही; परंतु आंदोलनाच्या दुसºया दिवसापासून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनात सहभागी नसलेल्यांनाही अटक केली जात असल्याचा आरोप जिल्हाअध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या वतीने वाशी येथे ही परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारिपचे अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामिया पटेल, संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत, विजय कांबळे, यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी अद्यापपर्यंत १२५ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७५ जणांना न्यायालयातून, तर २० जणांना टेबल जामीन मिळालेला आहे; परंतु जे आंदोलनात सहभागी नव्हते, अशांनाही अटक करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा घाट असल्याचाही आरोप ओहोळ यांनी केला. यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात असल्याची चिंता भारिपचे अरुण गायकवाड यांनी व्याक्त केली. तर महाराष्टÑ बंदच्या दरम्यान शांततेत आंदोलने होत असताना, त्रयस्थ संघटनांनी दंगे घडवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत यांनी केला.