घणसोली परिसरात विहिरी बुजविण्याचा प्रयत्न सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:45 AM2020-01-19T02:45:33+5:302020-01-19T02:45:47+5:30
विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे. आठही विभाग कार्यक्षेत्रातील विहिरींची गंभीर समस्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान केवळ दिखावूपणा असल्यामुळे या अभियानाची अक्षरश: पायमल्ली होत असल्याचे बोलले जाते. विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागाच्या कार्यक्षेत्रात विहिरींची एकूण संख्या ९४ आहे. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येण्या एवढ्या विहिरी तलावांच्या मध्यभागी आहेत. इतर विहिरी गावठाणाच्या मध्यभागी आणि गावठाणाबाहेर आहेत. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक विहिरीचा शेवाळ आणि पानफुटी तसेच जंगली झाडांच्या लहान-मोठ्या फांद्यांमुळे वापर होत नाही. घणसोली गावातील तीन बावडी परिसरातील विहिरीवर बांधकाम साहित्य तसेच केरकचरा टाकून विहिरींना विळखा घालून त्या काही भूमाफियांनी बुजविण्याचा प्रयत्न चालविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
घणसोलीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्स लॉबीकडून तर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे. शासकीय सुट्टीबरोबर शासकीय कामकाजाच्या दिवशीही येथे बांधकामे सुरू असूनही घणसोली अतिक्र मण विभागाचे संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. विहिरींचे लोखंडी जाळ्यांचे संरक्षण ग्रील अनेक ठिकाणी गंजलेल्या आहेत, तर अनेक विहिरीच्या जाळ्या गायब आहेत.
उघड्या गटारांची समस्या कायम आहे. वाढत्या अनधिकृत बांधकाम करणा-या व्यावसायिकांकडून गटारावरील आरसीसी झाकणे गायब होण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईतील सर्व तलाव, विहिरी आणि उघडी गटारे यांची पाहणी करून या प्रकरणी दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील विहिरींची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले.
विहिरींची विभागवार आकडेवारी : बेलापूर- ८, नेरुळ- १२, तुर्भे- १२, वाशी- ३, कोपरखैरणे- १३, घणसोली- २१, ऐरोली- १७ आणि दिघा- ८ अशी आहे.