पनवेल : बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनसाखळी हिसकावल्यामुळे विद्यार्थिनीच्या मानेला दुखापत झाली आहे.पनवेलमध्ये व्ही. के. हायस्कूल केंद्रावर तालुक्यातील बेळवली या गावातील अंजली जगदीश फडके ही १२वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी जात होती. बुधवारी १0.३0 च्या सुमारास शहरातील नाडकर्णी हॉस्पिटलजवळून परीक्षा केंद्रावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अंजलीच्या गळ्यातील चेन हिसकाविण्याचा प्रयत्न केला. चेन हिसकावताना मारलेल्या जोरदार धक्क्यात अंजली खाली पडली. या घटनेत तिच्या मानेवर दुखापत झाली आहे. या घटनेत अंजलीच्या गळ्यातील चेन चोरट्यांना मिळाली नाही. अंजली घाबरलेल्या स्थितीत परीक्षा केंद्रावर गेली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तिला प्राथमिक उपचार देऊन परीक्षेला बसवले. सर्वत्र बारावीची परीक्षा सुरू असल्याने चोरट्यांनी विद्यार्थिनींना आपले टार्गेट बनविले असल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.परीक्षेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नाही.
बारावीच्या विद्यार्थिनीची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न, पनवेलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:43 AM