नवी मुंबई : देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत असल्याने शुक्रवारी नववर्षानिमित्त किती आवक होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. फळांच्या राजाचा हंगाम यावर्षी लवकर सुरू झाला असला तरी यावर्षी आवक कमी असतानाही भाव चांगला मिळत नाही. सद्यस्थितीमध्ये ४० हजार पेट्यांची आवक होत आहे. यामध्ये कर्नाटक व आंध्रप्र्रदेशमधून १५ हजार व कोकणातून २५ हजार पेट्यांची आवक होत आहे. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ४ ते ८ डझनच्या पेटीला १५०० ते ५ हजार रूपये बाजारभाव मिळत होता. परंतु यावर्षी हेच दर १ हजार ते ३५०० एवढे आहेत. दक्षिणेकडील माल एक महिना लवकर बाजारात आल्यामुळे कोकणच्या हापूसचे दर घसरले आहेत. शुक्रवारी मार्केटमध्ये किती माल येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे यापुढे ग्राहकांकडून मागणी वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा असे आवाहन केले आहे.
आंबा मार्केटमधील मुहूर्ताकडे लक्ष
By admin | Published: April 08, 2016 1:58 AM