मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे माथाडी कामगारांचे लक्ष
By admin | Published: September 23, 2016 03:52 AM2016-09-23T03:52:38+5:302016-09-23T03:52:38+5:30
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई : माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. १५ वर्षे आघाडी शासनाने फक्त आश्वासनावर बोळवण केल्यामुळे भाजपा सरकार प्रत्यक्षात प्रश्न सोडविणार का याकडे कामगारांचे लक्ष लागले असून, या मेळाव्यात मुख्यमंत्रीही कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
माथाडी कायद्याचे व संघटनेचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक वर्षी या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहतात. काँगे्रस नेत्यांनीही अनेक वेळा मेळाव्यास हजेरी लावली आहे. माथाडी संघटना आतापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होती. परंतु सत्ता परिवर्तन होताच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाशी जवळीक साधण्यास सुरवात झाली आहे. याचाच भाग म्हणून यावर्षी मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आले आहे. माथाडी मेळाव्यास भाजपा नेते येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु पक्षापेक्षा कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे माथाडी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये वडाळामधील घरांच्या बांधकामामधील अडचणींचाही समावेश आहे. याशिवाय बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, पिंपरी - चिंचवड, सातारा, कोल्हापूर येथील माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे. माथाडी बोर्डामधील रिक्त सदस्यांची पदे भरण्यात यावीत. सुरक्षा रक्षक मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. बाजार समितीच्या बाहेरील माथाडी स्वरूपाची कामे माथाडी कामगारांना देणे. माथाडींच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याविषयीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविले तर वेळ पडल्यास त्यांच्या घरची भांडीही घासेन असे वक्तव्य यापूर्वी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मेळाव्यात केले होते. यामुळे शासनाने कामगारांचे प्रश्न सोडविल्यास कामगार संघटनेची भाजपाशी जवळीक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)