सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांचा मनोहारी कलाविष्कार

By Admin | Published: November 18, 2016 02:59 AM2016-11-18T02:59:51+5:302016-11-18T02:59:51+5:30

सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी कलाकृती सादर केल्या.

Attractive art discovery of Signal school students | सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांचा मनोहारी कलाविष्कार

सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांचा मनोहारी कलाविष्कार

googlenewsNext

ठाणे : त्यांची जिद्द, आवड आणि अंगी असलेले कलागुण ठाणेकरांसमोर आले, ते अत्रे कट्ट्यावर आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमामुळे. सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी कलाकृती सादर केल्या. त्यांच्या कलाकृतीला कधी टाळ्यांची दाद मिळाली, तर काही कलाकृती पाहून रसिकांचे मन हेलावले.
बुधवारी सिग्नल शाळेतील मुलांनी बाल दिन साजरा केला. ‘बम बम बोले’, ‘मन रानात गेलं गं’, ‘इतनी सी हसी’ यासारख्या गाण्यांवर नृत्य सादर करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. तसेच, ‘लाकूडतोड्याची गोष्ट’ सादर करून त्यांच्यातील अभिनय कला उपस्थितांसमोर सादर केली. मोहन काळे या विद्यार्थ्याच्या ‘मिळणार नाही पुन्हा आईबापाची माया’ या गाण्याने उपस्थित गहिवरले. पहिल्यांदाच व्यासपीठावर कलाकृती सादर करण्याची संधी मिळालेली ही मुले मनावर कोणतेही दडपण न आणता बिनधास्तपणे आपली कला सादर करत होती.
विशेष म्हणजे या वेळी त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर, सिग्नल शाळा या संकल्पनेशी संबंधितांची मुलाखत पार पडली. या वेळी महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सिग्नल शाळा या संकल्पनेविषयी सर्वांना माहिती दिली. पालकांचे प्रश्न आणि मीडियाचा सहभाग याविषयी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे कार्यवाह भटू सावंत यांनी सांगितले. समर्थ भारत व्यासपीठच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना सर्वसामान्यांचे आयुष्य देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सिग्नल शाळेच्या माध्यमातून या रस्त्यांवरील मुलांना जीवन जगण्यासाठीचे मूल्यशिक्षण देणे, हा हेतू या वेळी संस्थेने स्पष्ट केला. सिग्नल शाळेच्या पहिल्याच दिवसापासून या मुलांमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांचे विविध किस्से संस्थेच्या कोषाध्यक्षा आरती नेमाणे यांनी सांगितले.
सहा महिन्यांपूर्वी रस्त्यावर राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या या मुलांनी शाळेत प्रवेश केला. त्यांच्या शारीरिक, बौद्धिक गरजांना प्राधान्य देऊन त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून यात नक्की यश मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास कार्ले, शाळेच्या शिक्षिका आरती परब, अपर्णा सुनील, संध्या सावंत, दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांनी सिग्नल शाळेबरोबरचा अनुभव कथन केला. (प्रतिनिधी)

Web Title: Attractive art discovery of Signal school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.