नवी मुंबई: दिवाळीनिमीत्त महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाई पाहण्यासाठी मुख्यालयाबाहेर मध्यरात्रीपर्यंत नागरिक गर्दी करू लागले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत ही रोषणाई सुरू राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका नववर्ष, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व दिवाळीमध्ये मुख्यालयाच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करते. ही रोषणाई शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. रोषणाई पाहण्यासाठी व इमारतीसोबत कुटुंबिय व मित्रांबरोबर छायाचित्र घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. दिवाळीनिमीत्त १० नोव्हेंबरपरपासून रोषणाई सुरू झाली आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत नागरिक मुख्यालयाबाहेर गर्दी करू लागले आहेत. पामबीच रोडवरून जाणारे प्रवासीही वाहने थांबून रोषणाईचा अनुभव घेत आहेत. अनेक नागरिक मुख्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजीही करत आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत रोषणाईचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.