नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी प्रगतीचे व्यासपीठ ठरलेल्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील सामन्यांसाठी क्रिकेटपटूंचा सोमवारी लिलाव होणार असल्याचे या लीगचे मुख्य प्रवर्तक शाहआलम शेख यांनी सांगितले. माझगाव क्रिकेट क्लब आयोजित ही लीग १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कळंबोलीतील यजमानांच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
शाहआलम म्हणाले, स्थानिक क्रिकेटपटूंसाठी महत्वाची असलेल्या या लीगमधील आठ संघातील क्रिकेटपटूंसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत ठाणे जिल्हयातील वेगवेगळ्या भागातून मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेले सुमारे पाचशेहून अधिक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यातून तीनशे खेळाडूंची निवड करण्यात आली असून, निवडसमितीने त्यांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला अ गटातील पाच , ब गटातील तीन , क गटातील चार, ड गटातील दहा आणि मुंबई क्रिकेट संघटनेकडे नोंदणीकृत असलेले प्रथम दर्जाचे दोन ऑयकॉन खेळाडू खरेदी करायचे आहेत. लिलावाकरता अ गटात ४४, ब गटात २९, क गटात ३२ आणि ड गटात १६६ खेळाडू लिलावाच्या रिंगणात आहेत.
या लीगमध्ये अंबरनाथ ऍव्हेंजर्स, वाशी वारियर्स, कोपरखैरणे टायटन्स, मिरा भाईंदर लायन्स, बेलापूर ब्लास्टर्स, ठाणे टायगर्स, सानपाडा स्कॉर्पिअन, कल्याण टस्कर आदी आठ संघ विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेदरम्यान विजयी संघासह लीगमधील प्रत्येक संघाला रोख बक्षिसे देण्यात येतात. स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघ सात सामने खेळेल. त्यातील गुणानुक्रमे पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरतील असे लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित घोष यांनी सांगितले.