आरटीओकडील जप्तीतल्या रिक्षांचा लिलाव
By Admin | Published: July 2, 2017 06:26 AM2017-07-02T06:26:11+5:302017-07-02T06:26:11+5:30
विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून पडून असल्यामुळे, त्या जीर्ण स्थितीत आहेत. यामुळे जागा अडवली जात असल्याने त्या लिलावात काढण्याचा निर्णय आरटीतर्फे घेतला आहे.
जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करण्यासाठी शहरात पोलीस व आरटीओ यांना जागेची कमतरता भासत आहे. याच समस्येने सध्या आरटीओ अधिकारी ग्रासले आहेत. वाहन परवाना चाचणीसाठी असलेल्या मैदानाच्याच काही भागात विविध कारणांनी जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करावी लागत आहे. मागील काही वर्षांत जप्त केलेली अनेक वाहने त्या ठिकाणी पडून आहेत. त्यामध्ये ३९ रिक्षांचा समावेश आहे. यामुळे जागेची अडवणूक होऊन चाचणीचे मैदान विद्रूप झाले आहे. शिवाय वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने जीर्ण झाल्याने नादुरुस्त स्थितीत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून त्याचे मूल्य कमी होत चालले आहे; परंतु जप्तीत असलेल्या वाहनांच्या मालकांनी अद्यापही ती ताब्यात घेण्यासाठी आरटीओकडे पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे ही वाहने लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी कळवले आहे. त्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी दहा दिवसांत आरटीओकडे योग्य कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे वाहन ताब्यात घेण्याचे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.