माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षांचे अधिकार काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:34 PM2019-10-16T23:34:30+5:302019-10-16T23:34:40+5:30
आघाडीचा प्रचार केल्याने कारवाई : प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय
नवी मुंबई : ५० वर्षे काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत असलेल्या प्रमुख चार माथाडी संघटनांनी प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संघटनेचा आदेश डावलून राष्ट्रवादीचा प्रचार करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांचेही अधिकार काढण्यात आले आहेत. बेलापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारालाही संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील माथाडी कायद्याला व चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या मूळ संघटनेमधून बाहेर पडून चार प्रमुख संघटना तयार झाल्या होत्या. या संघटनांच्या प्रतिनिधींनी विभक्त झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेतली. माथाडी नेते नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, दीपक रामिष्टे, प्रकाश पाटील व इतर नेत्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली. वेगवेगळ्या संघटना असल्या तरी सर्वांनी माथाडी कामगारांच्या हिताला नेहमी प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत कामगार व संघटना होती; परंतु आता प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी कायदा टिकला पाहिजे, कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले.
माथाडी संघटनेने युतीला पाठिंबा आहे. यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश शिंदे यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव हेही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेल्यामुळे त्यांचे अधिकार काढण्यात आले आहेत. त्यांची गाडीही काढून घेण्यात आली आहे. संघटनेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अध्यक्षांनी आघाडीच्या व्यासपीठावर जाणे योग्य नसल्याने हा निर्णय घेतला असून त्यांच्याविषयी पुढील निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे कोरेगावमधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ते संघटनेचे प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली आहे.
शिंदे यांच्याविरोधात प्रचार करणार
माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोरेगावमधून निवडणूक लढवत आहेत. माथाडी संघटनेने भाजप व शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदे हे प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नसली तरी त्यांच्याविरोधात कोरेगावमध्ये जाऊन प्रचार करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे. युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही स्पष्ट केले.
‘आम्ही बांगड्या भरल्या नाहीत’
माथाडी संघटनेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे का? भविष्यात याचा फटका बसण्याची शक्यता आहे का? याविषयी विचारणा केल्यानंतर आम्ही कामगारांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. कामगार संघटना चालविताना सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. कोणी चुकीची भूमिका घेतली तर आम्हीही हातात बांगड्या भरल्या नाहीत, असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.
‘मराठा आरक्षणाविषयी चुकीची माहिती’
मराठा आरक्षण रद्द झाले असल्याची काही जणांनी समाजमाध्यमांवरून अफवा पसरविली आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. याविषयी पसरविण्यात येणाºया अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी या वेळी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती या वेळी दिली.