लग्नातील भपकेबाजपणा टाळा
By admin | Published: January 5, 2017 05:26 AM2017-01-05T05:26:30+5:302017-01-05T05:26:30+5:30
णत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.
चिकणघर : कोणत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक प्रगतीचा आलेख खुंटलेलाच राहील. त्याकडे आगरी-कोळी समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी कोळीवली येथे रविवारी व्यक्त केले.
शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे झालेल्या ‘साखरपुडा आणि हळदी समारंभमुक्त गाव’ या चळवळीच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.
या वेळी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, कोळी समाज संघाध्यक्ष अनंत तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव गोरे तसेच परिसरातील आगरी-कोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील पूढे म्हणाले, की आगरी-कोळी समाजात मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी साखरपुडा आणि हळदी समारंभात खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैशाची अनावश्यक उधळण केली जाते. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर समाज परिवर्तनास चालना मिळू शकते. जमीन विकून, कर्ज काढून लग्नाचा खर्च भागविणे हा कसला व्यवहारीपणा? हे तर स्वत:सह समाजाला दारिद्र्यात ढकलण्यासारखे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले.
यापूर्वी समाजातील अनेक व्यक्तींनी जुन्या परंपरा कशा मोडीत काढल्या आणि सुधारणा घडवली, याचे दाखले यावेळी दिले.
अनंत तरे, राजाराम साळवी यांनीही आपल्या भाषणातून साखरपुडा व हळदी समारंभावर नियंत्रण आणण्याचे ग्रामस्थांना अवाहन केले. (वार्ताहर)