नवी मुंबई : गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत, यासाठी महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली आहे. डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून २00 आयसीयू व ८0 व्हेंटिलेटर्स उपलब्ध केले जाणार आहेत. यामुळे आयसीयू बेड्सच्या अभावी रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मिशन ब्रेक द चेन हाती घेतले आहे. जास्तीतजास्त टेस्ट करून वेळेत रुग्ण शोधून त्यावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईमध्ये आयसीयू युनिट व व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्यामुळे, गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची गैरसोय होत होती. मृत्युदरही वाढू लागला होता. मृत्युदर कमी करण्यासाठी आयसीयू युनिट व व्हेंटिलेटर्स वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाशी करार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या वतीने डॉ. डी.वाय.पाटील समूहाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मान्यतेने, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पेद्दावाड यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेने २०२ आयसीयू बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये या अतिरिक्त २०० आयसीयू बेड्सची लक्षणीय भर पडणार आहे. त्यामुळे एकूण ४०२ आयसीयू बेड्स नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या वतीने पहिल्या टप्प्यात १0 आॅगस्टपर्यंत ५0 आयसीयू बेड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर, १0 दिवसांच्या तीन टप्प्यात ३0 दिवसांमध्ये उर्वरित बेड्ससहीत एकूण २00 आयसीयू बेड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासोबतच, ८0 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.महापालिकेच्या माध्यमातून होणार मोफत उपचार१सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ९३ व्हेंटिलेटर्समध्ये या ८0 अतिरिक्त व्हेंटिलेटर्सची भर पडून, एकूण १७३ व्हेंटिलेटर्स नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.२या रुग्णालयामधील ही २00 आयसीयू बेड्स व ८0 व्हेंटिलेटर्सची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येत असून, रुग्णाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या रुग्णाचे उपचार महापालिकेमार्फत मोफत करण्यात येणार आहेत.