अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत टाळाटाळ
By admin | Published: July 9, 2015 12:53 AM2015-07-09T00:53:34+5:302015-07-09T00:53:34+5:30
औद्योगिक वसाहतीमधील बोनसरी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली.
नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील बोनसरी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. परंतु बांधकाम पूर्ण झाले तरी अद्याप कारवाई करण्यात आली नाही.
एमआयडीसीमधील मोकळ्या जागांवर झोपड्या व दुकान गाळे बांधले जात आहेत. बोनसरी गाव परिसरात अनधिकृतपणे गाळे व इतर बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. हा प्रकार निदर्शनास येताच शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी विभाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. विभाग अधिकारी, अतिरिक्त आयुक्त सर्वांना भेटून याविषयी माहिती देण्यात आली. कारवाई केली नाही, तर एमआयडीसीतील सर्व मोकळ्या जागा अडविल्या जातील. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अद्याप अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही. (प्रतिनिधी)