उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; पनवेलमध्ये नवीन इमारतीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:40 PM2019-07-26T23:40:31+5:302019-07-26T23:40:39+5:30
मनुष्यबळाच्या भरती प्रक्रिया बाकी
वैभव गायकर
पनवेल : पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. मनुष्यबळाच्या भरतीनंतर हे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यावर पनवेलकरांना दिलासा मिळेल. सध्याच्या घडीला सुरू असलेले ग्रामीण रुग्णालय पनवेल शहराच्या टोकाला आहे. त्या ठिकाणचे मनुष्यबळ, खाटांची संख्या, सुविधा अपुऱ्या असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
१२० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदन गृहाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये शव ठेवण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. विशेष म्हणजे, पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाजवळील शवविच्छेदनगृह अपुºया जागेत, दुरवस्था झालेल्या खोलीत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शवविच्छेदनगृह असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसतो. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभागाचा यात समावेश आहे.
शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभाग सुरू होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी जाणार असला तरी उर्वरित सर्व काम पूर्ण झाल्याने लवकरात लवकर हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेलकरांकडून होत आहे.
सध्याच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी व अधिकाºयांची संख्या १४ आहे. मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. लवकरात लवकर उर्वरित कामे पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. आरोग्यमंत्र्यांच्या दालनात आमदार प्रशांत ठाकूर, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, सहआयुक्त डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. गौरी राठोड आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ५४ कायमस्वरूपी पदे तर ९७ तात्पुरत्या स्वरूपातील पदे भरली जाणार आहेत. तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांच्या मार्फ त देण्यात आले आहेत.
गैरसोय दूर होणार
मुंबई-गोवा जुना महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा या महामार्गावर सतत वर्दळ असते, त्यामुळे अपघातांची संख्याही मोठी आहे. अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. नवीन उपजिल्हा रुग्णालयामुळे ही गैरसोय दूर होणार असून, रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील.