Omicron Variant : ‘त्या’ परदेशी प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा, ओमायक्राॅनबाबत प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 10:50 AM2021-12-27T10:50:44+5:302021-12-27T10:51:05+5:30
Omicron Variant : राज्यभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने नुकतीच रात्रीची जमावबंदी सुरू केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही जमावबंदी पालिका क्षेत्रात लागू केली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : खारघर शहरात परदेशी प्रवासाची हिस्ट्री असलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल १६ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित रुग्ण आणि कुटुंबीयांचे ओमायक्रॉन अहवाल तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवले होते. मात्र दहा दिवसांनंतरही पालिका क्षेत्रातील चार ओमायक्रॉन संशयितांचा अहवाल प्रलंबित असल्याने शासकीय पातळीवरील उदासीनता समोर आली आहे.
राज्यभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने नुकतीच रात्रीची जमावबंदी सुरू केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही जमावबंदी पालिका क्षेत्रात लागू केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत देखील ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून काेराेनाच्या दैनंदिन रूग्ण संख्येतही वाढ हाेत आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिका सतर्क बनली आहे. मात्र दहा दिवसांनंतरही अहवाल प्रलंबित असल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाला केवळ या अहवालाची वाट बघण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. सध्या पालिका क्षेत्रात नजीकच्या काळात परदेश वारी केलेल्या रुग्णांची संख्या १६०३ एवढी आहे. यापैकी बहुतांशी रुग्णांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
संशयित चार ओमायक्रॉन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त झाल्यावरच याबाबत बोलणे उचित ठरेल.
- डॉ. आनंद गोसावी
मुख्य वैद्यकीय अधिकारी,
पनवेल महानगरपालिका