- सूर्यकांत वाघमारे ।नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ६३ संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, त्यात खासगी कंपन्यांसह शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांचा समावेश आहे. त्याद्वारे दोन महिन्यांत सुमारे १४ हजार दुचाकीस्वारांना वाहतुकीची शिस्त लावण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत.
रस्ते अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, त्यानुसार राज्यभर विविध उपक्रमातून वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. नवी मुंबईतही अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या गंभीर असून, मागील दोन वर्षांत पोलिसांकडून झालेल्या जनजागृतीमुळे त्यात काही प्रमाणात घट झाली आहे. तर चालू वर्षात मार्चमध्ये ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ हा उपक्रम हाती घेऊन पोलिसांनी अधिकाधिक दुचाकीस्वारांना सुरक्षेचे धडे देण्यावर भर दिला आहे. त्यानुसार दोन महिन्यांत ६३ संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये आयटी पार्क, मोठमोठ्या खासगी कंपन्या यासह शासकीय व निमशासकीय संस्थांचा समावेश आहे. यामुळे त्या ठिकाणी काम करणाºया सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.
२०१७ मध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १२७२ अपघातांमध्ये २२३ प्राणांतिक अपघात घडले होते. त्यामध्ये २३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०१८ मध्ये १११८ अपघातांपैकी २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांना प्राण गमवावे लागले होते. शहरातील पामबीच, ठाणे-बेलापूर तसेच सायन-पनवेल या महत्त्वाच्या मार्गांसह शहरांतर्गतच्या रस्त्यांवर हे अपघात घडले आहेत. त्यात मृत पावणाºयांमध्ये तरुणवर्गाची संख्या दखलपात्र असल्याने पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी वाहतूक पोलिसांमार्फत विशेष अभियानावर भर दिला. त्यानुसार कारवाई बरोबरच चालकांमध्ये वाहतुकीची शिस्त लावण्याकरिता ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ उपक्रम राबवला जात आहे. ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ अंतर्गत किमान १०० संस्थांमध्ये जनजागृती करण्याचा वाहतूक पोलिसांचा संकल्प आहे. त्यानुसारच्या चार टप्प्यात हा उपक्रम राबवला जात असून, त्यांच्या अंतिम टप्प्यात शाळा व महाविद्यालयांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे.वाहतुकीचे नियम तोडणाºयांवर सातत्याने कारवाई करूनही त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही, यामुळे वाहतुकीचे नियम पाळल्यास एखाद्या अपघातामध्येही त्यांचे प्राण कशा प्रकारे वाचू शकतात, याची माहिती त्यांना दिली जात आहे. त्याकरिता पोलिसांद्वारे प्रबोधनाऐवजी संबंधित कर्मचाºयांच्या वरिष्ठांमार्फतच त्यांची जनजागृती केली जात आहे.
ज्या संस्थांकडून ‘कॅम्पस विथ हेल्मेट’चे पुरेपूर पालन केले जात आहे. अशा संस्थांना पोलिसांकडून प्रशस्तिपत्रही दिले जाणार आहे. त्याद्वारे अधिकाधिक वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागेल, असा पोलिसांना विश्वास आहे.
‘कॅम्पस विथ हेल्मेट’ या उपक्रमाला खासगी, शासकीय व निमशासकीय संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांत ६३ सोसायट्यांमध्ये त्याची सुरुवात झाली असून, तिथल्या सुमारे १४ हजार दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात आहे, यामुळे अपघातांमध्ये जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.- सुनील लोखंडे, पो. उपआयुक्त, वाहतूक शाखा