अनंत पाटील नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आनुषंगाने नवी मुंबईत साजरे होणारे होळी आणि धूलिवंदन सण,उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धूलिवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे .
.त्यामुळे आगरी कोळ्यांचा ‘आवंदाचा शिमग्याचा सन दाराशी नय व्हनार’ हे शाहीर रमेश नाखवा यांचे ‘आमचे दाराशी हाय शिमगा’ हे शिमग्याचे गाणे घराघरात वाजेल, हे मात्र नक्कीच. असे असले तरी दिवाळे कोळीवाड्यात शासनाच्या आदेशाचे पालन करून रविवारी रात्री होळीला अग्नी देण्यात येणार आहे. दिवाळे कोळीवाड्यात सायंकाळी ७ ते रात्रो ९ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होळी मातेचे दर्शन आणि रात्री ९.३० वाजता होळीला अग्नी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दरवर्षी मात्र या कोळीवाड्यात सलग नऊ दिवस आधीपासूनच शिमग्याच्या सणाला सुरुवात होत असे. कोरोनाच्या महामारीमुळे या शिमग्याचा सणाला जाता येणार नसल्यामुळे महिलांचा हिरमोड होणार आहे. रंगपंचमीसाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी रंगाची फारशी उधळण होणार नाही. त्यामुळे होळीच्या एक महिन्या अगोदरपासून होलसेल विक्रेत्यांनी आणलेल्या रंगांचा साठा तसाच पडून राहण्याची शक्यता एपीएमसीमधील एका व्यापाऱ्याने व्यक्त केली.
ऑर्गेनिक रंग वापरा‘आपल्याला होळी रंगांनीच खेळायची आहे, तर यासाठी आपण ऑर्गेनिक रंगांचा वापर करू शकता. आपल्या स्वयंपाक घरात असे बरेच पदार्थ आहे ज्यांचा वापर आपण रंग बनविण्यासाठी करू शकतो. हे हानिकारकदेखील नसणार रंग बनविण्यासाठी आपण हळद, मेंदी पावडर, बीट आणि चंदन पावडरचा वापर करू शकता.’ - रामनाथ म्हात्रे, तुर्भेगाव
रंगांनी नव्हे तर फुलांनी होळी खेळाबरेच लोक असं मानतात की होळीचा सण रंगाशिवाय अपूर्ण आहे. परंतु यंदा आपण कोरोनामुळे होळी रंगांच्या ऐवजी फुलांनी खेळू शकता. यामुळे रासायनिक रंगाचा त्रास होणार नाही. आपण नैसर्गिक फुलांचा वापर करून होळी खेळू शकता.’ - हेमंत कोळी, ग्रामस्थ, दिवाळे कोळीवाडा