जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती
By योगेश पिंगळे | Published: December 1, 2023 06:00 PM2023-12-01T18:00:00+5:302023-12-01T18:00:15+5:30
स्वयंसेवकांडून विविध प्रकारचे पोस्टर्स व रांगोळी बनवून आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली.
जागतिक एड्स दिन २०२३ ची थिम समाजाच्या पुढाकाराने -एड्सचा समूळ नाश करु" ही आहे. सदरच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आरआरसी क्लबचे कौन्सेलर जवंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेड-रिबिन बांधून जनजागृती केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असून त्यांना या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे जनजागृती व्हावी, मूलभूत हक्क, कर्तव्य-जबाबदारी, यांबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे असा होता.
स्वयंसेवकांडून विविध प्रकारचे पोस्टर्स व रांगोळी बनवून आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्षा मोहिते या स्वयंसेविकेने भाषनातून एड्स दिनानिमित्त या रोगाची माहिती व संसर्ग या विषयी समजावून सांगितले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेविका पौर्णिमा मोरे आणि श्रद्धा सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक, नवी मुंबई विभाग समन्वयक डॉ.पी.जी.भाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि चेअरमन डॉ.एल.व्ही. गवळी आणि प्रा.अमित सुर्वे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.