बाबा महाराज सातारकरांची आयुष्यभर व्यसनमुक्तीची चळवळ; १५ लाख नागरिकांची व्यसनांपासून सुटका

By नामदेव मोरे | Published: October 27, 2023 07:27 AM2023-10-27T07:27:05+5:302023-10-27T07:27:57+5:30

लाखो नागरिकांना वारकरी संप्रदायाशी जोडले

baba maharaj satarkar lifelong de addiction movement relief of 15 lakh citizens from addiction | बाबा महाराज सातारकरांची आयुष्यभर व्यसनमुक्तीची चळवळ; १५ लाख नागरिकांची व्यसनांपासून सुटका

बाबा महाराज सातारकरांची आयुष्यभर व्यसनमुक्तीची चळवळ; १५ लाख नागरिकांची व्यसनांपासून सुटका

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून आयुष्यभर समाजप्रबोधनाचा जागर केला. त्यांच्या वाणीमध्ये परिवर्तनाची शक्ती होती. प्रत्येक कीर्तनानंतर त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी श्रोत्यांची झुंबड उडत होती. आयुष्यभर लाखो नागरिकांना त्यांनी वारकरी संप्रदायाची दिक्षा दिली. तुळसीमाल घालून शाकाहरी बनविले. हजारो नागरिकांची दारूच्या व्यसनातून मुक्तता केली. राज्य शासनाने या कार्याची दखल घेऊन त्यांना व्यसनमुक्तीसाठी पुरस्कार देऊन गौरविले होते.

अध्यात्म व संतांचे विचार देश-विदेशांतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी बाबामहाराज सातारकर यांनी सहा दशके अखंड परिश्रम घेतले. त्यांच्या वाणीमध्ये गोडवा होता. साध्या, सोप्या शब्दांमधून ते संतांचे विचार व जीवनाचा अर्थ समजून सांगत. व्यसनामुळे समाजाची व कुटुंबाची होणारी हानी यांवर भाष्य करत. व्यसनमुक्तीवर त्यांनी व्यक्त केलेले विचार श्रोत्यांच्या  हृदयाला भिडत. वारकरी संप्रदाय व शाकाहाराचे महत्त्वही पटायचे.  त्यांच्या कीर्तनाला हजारोंचा जनसमुदाय असायचा. प्रत्येक कीर्तनानंतर मनपरिवर्तन झालेले शेकडो नागरिक वारकरी संप्रदायाचे पाईक होण्याची शपथ घेत. महाराजांच्या हातून वारकरी संप्रदायाची दीक्षा घ्यायचे, तुळसीमाळ घालून शाकाहारी व्रताचा अंगीकार करायचे. व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घ्यायचे. आयुष्यभर हजारो नागरिकांना त्यांनी व्यसनांच्या विळख्यातून मुक्त केले.   

कीर्तनामुळे आयुष्याचा अर्थ समजला, व्यसनांपासून सुटका झाली अशी प्रतिक्रिया निधनानंतर दर्शनासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी व्यक्त केली. कुठेही गाजावाजा न करता व्यसनमुक्तीची ही चळवळ त्यांनी आयुष्यभर चालविली.

१९ वर्षे ज्ञानेश्वरीची प्रवचने 

१९७४ मध्ये दादामहाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

बाबामहाराज सातारकर यांनी आयुष्य समाजप्रबोधन करण्यासाठी खर्च केले. व्यसनापासून समाज मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या वाणीमुळे प्रभावित होऊन हजारो नागरिकांनी व्यसनांचा त्याग केला. - शिवराम पाटील, बाबा महाराजांचे निकटवर्ती.

सातारा येथे बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये आम्ही  संपूर्ण कुटुंबीयांनी तुळसीमाळ घातली. अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्यानंतर आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आले. महाराजांमुळे हजारो नागरिक व्यसनमुक्त झाल्याचे अनुभवले आहे. - श्रीपती माने, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष, सातारा जिल्हा.


 

Web Title: baba maharaj satarkar lifelong de addiction movement relief of 15 lakh citizens from addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.