हरीचा दास वैकुंठासी गेला, आम्ही जातो आमुच्या गावा...; बाबामहाराज सातारकर अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 06:14 AM2023-10-28T06:14:16+5:302023-10-28T06:17:24+5:30
ज्ञानोबा, विठोबाचा जयघोष व माउली.. माउली.. गजराने परिसर भक्तीमय झाला होता. अनुयायांनी निरोपासाठी साडेतीन किलोमीटरची दिंडी काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आपल्या रसाळ वाणीने अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारे आणि भागवत संप्रदाय जगभर पोहोचविणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना टाळ-मृदंगाच्या गजरात व शासकीय इतमामात साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ज्ञानोबा, विठोबाचा जयघोष व माउली.. माउली..च्या गजराने परिसर भक्तीमय झाला होता. अनुयायांनी निरोपासाठी साडेतीन किलोमीटरची दिंडी काढली.
नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून अंत्ययात्रा निघाली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून व बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली. महाराजांचे नातू चिन्मयमहाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी महाराजांच्या भगिनी माईमहाराज, मुलगी भगवतीताईमहाराज आणि रासेश्वरी सोनकर उपस्थित होते.
८ नोव्हेंबरला समाधी सोहळा
महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांची समाधी नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उभारण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबरला हा समाधी सोहळा होणार आहे.
भव्य स्मारक उभारणार
बाबामहाराजांनी साध्या, सोप्या शब्दांत समाज प्रबोधन केले. नवी पिढी अध्यात्माशी जोडली. शासनाच्या वतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबामहाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर दिली.
२४ तास अखंड भजनातून भावांजली
बाबामहाराजांना अखंड २४ तास भजनातून भावांजली अर्पण करण्यात आली. बाबामहाराजांचे पार्थिव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आणण्यात आल्यानंतर भक्तगणांनी भजनातून भावांजली वाहिली. कर्नाटकी भाविकांनी मराठीत भजनाचे सादरीकरण केले. रात्रभर अखंड नामस्मरण सुरू होते. पहाटेपासून भक्तांची गर्दी वाढली. जास्तीतजास्त भाविकांना भजन म्हणण्याची संधी दिली जात होती. ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कीर्तनकारांनी भजनातून आदरांजली वाहिली.