अनंत पाटील नवी मुंबई : नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे बेलापूर महामार्गावरील तुर्भे नाका सर्कल ते नेरुळच्या एलपी बस थांब्यापर्यंतच्या रस्त्यात लहान-मोठे खड्डेच खड्डे पडल्याने १० मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास लागत आहे. ठाण्याहून पुण्याच्या दिशेने ये-जा करण्यासाठी ठाणे-बेलापूर हा महत्त्वाचा असून, या रस्त्याची यंदाच्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
ठाण्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी शीव-पनवेल महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील वाहनांचा भार वाढल्यानंतर, १९९७ /९८ या कालावधीत दिघा ते तुर्भे या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी नवी मुंबई महापालिका आणि केंद्र सरकारच्या ‘असाइड’ योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून, या मार्गाचे रुंदीकरण, तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरण केले. मात्र, सध्या या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. याच मार्गावरून ओपोलो हॉस्पिटल सर्कलकडून उरण फाट्याच्या दिशेने अवजड वाहनांतून जेएनपीटीकडे सामानाची, तसेच यंत्रसामुग्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे तर या महामार्गावरून जाणेही कठीण झाले आहे. या रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तुर्भे सर्कल ते नेरुळपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे दिसू लागतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूककोंडी असते. त्यातच आता खड्ड्यांमुळे येथे वाहनांच्या रांगा लागत आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवी मुंबईत नेरुळ येथे डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम येथे झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी नवी मुंबईतील तुर्भे ते सानपाडा या भागातील महामार्गाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने तुर्भे सर्कल या रस्त्यावरील खडी आणि डांबर वाहून गेले आहे.
वाशी ते बेलापूरदरम्यानचा १४ किलोमीटरचा शीव-पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी संमत केला. मात्र, त्यावर अजून राज्य सरकारची मोहोर उमटलेली नाही. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचा महापालिकेचा दावा आहे.तुर्भे सर्कलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांची पार दुर्दशा झाल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. अनेकदा दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यासाठी संबंधित खात्याने या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी. - दिनेश ठाकूर, वाहन चालक, शिरवणे, नवी मुंबईखारघर सेक्टर १० मध्ये अपघाताचा धोकाखारघर शहरातील सेक्टर १० मधील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. मागील वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून या रस्त्याची दुरुस्ती केली गेली नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिडकोमार्फत या रस्त्याचे टेंडर काढले गेल्याचे नागरिकांना सांगितले जात असून, येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कोपरा स्मशानभूमी ते शंकर रेसिडेन्सी, तुलसी कमल या बिल्डिंगजवळ ड्रेनेज लाइनजवळ मोठा खड्डा पडला आहे. गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते दुरुस्त केले जातील, असे आश्वासन सिडकोमार्फत देण्यात आले होते. मात्र, अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली गेली नसल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले.पनवेल परिसरातील रस्त्यांची चाळण1)पनवेल परिसरात गेल्या दहा दिवसांपासून संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्ते, तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने, अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.2)पनवेल शहरातील मुख्य रस्त्याबरोबर राष्ट्रीय महामार्ग जातो. पावसामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी डांबर निघून खडी वर आली आहे. काही ठिकाणी खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. कळंबोली गावाजवळ उड्डानपुल, तसेच गावात जाण्यासाठी पुलाखालीच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात स्टील मार्केट असल्यामुळे अवजड वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अवजड वाहनांमुळे खड्ड्यांचा आकार वाढताना दिसून येत आहे.3)दरवर्षी या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. यंदाही जास्त प्रमाणात खड्डे पडले आहेत. पनवेलमधून पुण्याला जाणाºया महामार्गावर, पनवेल ओरीयन मॉलसमोरील उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. पळस्पे फाटा उड्डाण पुलाजवळ, गोवा महामार्गावर रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.4)आसुडगाव डेपोला जणाºया रस्त्यावर एमएमटीची वर्दळ असते. तेथेही अवस्था वाईट आहे. खड्डे पडले आहेत, तसेच कामोठे, कळंबोली वसाहतीत रस्त्याची चाळण झाली आहे, तर शिवसेना ते मार्बल मार्केट रस्तावरील अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले आहे.पनवेल परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी चालकांकडून होत आहे.