पनवेल : पनवेल शहरातील महापालिके जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदान ते कामोठे सर्कलपर्यंत बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले सहभागी झाली होती. समाजाला जागृत करण्यासाठी व महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत बहुजन क्र ांती मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पनवेल शहरातून कामोठेपर्यंत मोर्चात नागरिकांनी विविध घोषणा दिल्या. सकाळपासून नागरिक मोर्चात हळूहळू सहभागी होत होते. क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नैना प्रकल्प बाधित गावांत व विमानतळ बाधित गावांत जाऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, याला हवा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. या मोर्चास रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक, शेतकरी अशा सुमारे १३० संघटनांनी पाठिंबा दिला होता.रिलायन्स, आरसीएफ, जेएसडब्लू, ओएनजीसी, जेएनपीटी व रायगडमधील इतर खासगी कंपनीतील कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करून घ्यावे, कोपर्डी प्रकरण, तसेच त्यापूर्वीच्या व त्यानंतरच्या तत्सम प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात येऊन त्यासाठी स्वतंत्र न्यायालये व स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना प्रकल्पबाधित लोकांना त्वरित न्याय मिळावा, भटक्या विमुक्त जाती जमातींना अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण मिळावे, ओबीसीमधील अल्पसंख्याक व्यावसायिक जातींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे, बहुजन समाजातील राजकीय नेत्यांवरील राजकीय आकसापोटी केलेली कारवाई थांबवावी, ख्रिश्चन जनसमुदाय, चर्चवरील हल्ले थांबवावेत व त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, आदी विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Published: December 25, 2016 4:38 AM