पनवेल : लोकसभा निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी जनतेसह बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारल्याचा दावा आंबेडकरी विचाराचे नेते डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे. वंचित आघाडीच्या आवाहनाकडे पाठ दाखवत बहुजनांसह मागासवर्गीय मतदारांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान करणे हिताचे मानल्याचे डॉ. डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे.राज्यात एकूण पाच कोटी ३६ हजार २२० मतदारांनी मतदान केले आहे. राज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लीम समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. हे लक्षात घेता त्यांची एकत्रित एक कोटी ७० लाख ६७ हजार ५९० इतकी मते बहुजन वंचित आघाडी, तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात बहुजन वंचित आघाडीला ३६ लाखांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, मुस्लीम सर्वच आघाडीवर मतदारांनी बहुजन वंचित आघाडीला नाकारल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळत असल्याचे डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांचे निवास असलेल्या पुण्यातही बहुजन वंचित आघाडीला आपला फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे मागील तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत; परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा फायदा समाजाला झालेला नाही. कारण या दोन्ही नेत्यांचे राजकारण बेरजेकडे जाण्याऐवजी वजाबाकीच्या दिशेने सुरू असल्याची टीका डोंगरगावकर यांनी केली आहे. बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस सोबत आघाडी केली असती, तर चार ते पाच जागा सहज पदरात पाडून घेता आल्या असत्या. तसेच त्यामुळे काँग्रेसच्या जागाही वाढल्या असत्या; परंतु चुकीच्या धोरणामुळे रिपब्लिकनच्या राजकीय चळवळीची मोठी हानी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारले, डॉ. डोंगरगावकर यांचा आकडेवारीसह दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:12 AM