‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला जामीन, कारवाईबाबत साशंकता : तांत्रिक बाबींमुळे मिळाले बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 06:27 AM2023-08-31T06:27:14+5:302023-08-31T06:27:55+5:30
सिडकोच्या प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक जगदीश राठोड (५३) यांच्यावर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली होती.
नवी मुंबई : दहा हजारांच्या लाचप्रकरणी कारवाई केलेल्या सिडको अधिकाऱ्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता तांत्रिक बाबीच्या आधारे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे या अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सबळ पुरावे नव्हते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सिडकोच्या प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक जगदीश राठोड (५३) यांच्यावर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली होती. एका दलालाच्या तक्रारीवरून त्यांच्यावर सापळा लावला होता.
कारवाई परिपूर्ण होती का?
दरम्यान, राठोड यांनी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे एसीबीच्याच कारवाईत नमूद होते. त्यामुळे १० हजार रुपये लाच दिली कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय दलालाने तीन हजार रुपये राठोड यांच्या टेबलवर ठेवल्यानंतर एसीबीचे पथक धडकले होते, अशीही चर्चा आहे. याच्या पुष्टीसाठी एसीबीचे उपअधीक्षक म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. कारवाईनंतर बुधवारी राठोड यांना सीबीडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तांत्रिक बाबींच्या आधारे त्यांची जामिनावर सुटका केली. यावरून कारवाई परिपूर्ण होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दलालांचा दबदबा
मागील काही दिवसांपासून सिडको व महापालिका मुख्यालयात दलालांचा दबदबा वाढत चालला आहे. कारवाईचा धाक दाखवून कामे साधून घेतली जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामागे कोणाचे अदृश्य पाठबळ आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.