नवी मुंबई : आपले बाह्यरूप कसे आहे, यापेक्षा आतून निरोगी राहणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हीच खऱ्या अर्थाने निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.अतिरिक्त ताणामुळे सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे निरोगी आयुष्याबाबत त्यांच्यात जनजागृती करण्याच्या दृष्टीने सिडको एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सोमवारी सिडकोभवनमध्ये डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांनी निरोगी आयुष्याचा कानमंत्र दिला.दीक्षित डाएट प्लॅन सध्या लोकप्रिय झाला आहे. मुळात श्रीकांत जिचकार हे या आहार पद्धतीचे आद्य प्रवर्तक आहेत. यात अधिक संशोधन करून आपण ही पद्धती विकसित केल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी यावेळी दिली. ही आहार पद्धती विनाखर्चाची असून अमलात आणण्यासाठी अत्यंत सोपी आहे. या आहार पद्धतीनुसार भुकेच्या वेळा ओळखून दिवसातून फक्त दोन वेळा भोजन करावे आणि नियमित ४५ मिनिटे व्यायाम करावा. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो, असे डॉ. दीक्षित यांनी यावेळी स्पष्ट केले. ही आहार पद्धती काटेकोरपणे नियंत्रणात आणल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल, जे. टी. पाटील, विनोद पाटील, मिलिंद बागुल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संतुलित आहार निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली- डॉ. जगन्नाथ दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:45 AM