नवी मुंबई : बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज आहे. बालनाट्यामुळे अनेक मुलांच्या बुध्दीला चालना मिळून ती हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे बालनाट्याचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो. याकरिता ‘लोकमत’ने लहान मुलांच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरवाव्यात, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांनी काढले. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.लोकमत सखी मंचच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सखी सन्मान पुरस्कार २०१७’ हा सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शौर्य, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला-सांस्कृतिक, फॅशन, सामाजिक क्षेत्रातील सखींना सखी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विद्याताई पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाट्यकर्मीच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतल्याचे आभार त्यांनी व्यक्त केले.बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज देखील विद्याताई पटवर्धन यांनी व्यक्त केली. अनेकदा अभ्यासात ढ असलेली मुले देखील बालनाट्यामुळे हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरवाव्यात, असे प्रतिपादनही त्यांनी केले.सखी सन्मान पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शौर्य, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला-सांस्कृतिक, फॅशन, सामाजिक क्षेत्रातील महिलांना ‘सखी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांना नाट्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.- या प्रसंगी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, आरके ग्रुपचे राजेंद्र कोळकर, टिपटॉपचे रोहित शहा, रौनकचे अमरदीप सिंग, बांधकाम व्यावसायिक संदीप तांबे, मोराज बिल्डर्सचे मोहन गुरनानी, रवी मसालेचे विजय जैन, विक्रांत अॅडर्व्हटायझिंगचे विकास खुल्लर,एचएफएफचे नावेद शेख, जाफर पिरजादा, आरती धुमाळ, अनिता नायडू, स्पार्क डान्स अॅकॅडमीच्या विनीता रजनानी आदींची विशेष उपस्थिती होती.
‘बालनाट्य चळवळ जोपासण्याची गरज’, विद्याताई पटवर्धन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:28 AM