नवी मुंबई : एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे येथील अतिक्रमण वाढतच गेले. एमआयडीसीच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमण करून वसविण्यात आलेल्या यादवनगरचे वास्तव ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. परप्रांतीयांनी केलेले हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी शहर व औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी स्वत:ची जमीन दिली, त्यांच्या बांधकामांवर सिडको, महापालिका व एमआयडीसी कारवाई करते. परंतु परप्रांतीयांनी केलेल्या अतिक्रमणांना अभय दिल्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक शिवसेनेच्या सुषमा दंडे महापौर असताना तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांनी यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कडक कारवाई केली होती. १९९५ पूर्वी येथे जवळपास ५० बांधकामे होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नंतरची अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. यानंतर काही नेत्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मराठी माणसांची घरे पाडली जात असल्याचे सांगितले. संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी त्या अधिकाऱ्याला मातोश्रीवर बोलावून जाब विचारला. अधिकाऱ्याने तेथील वास्तव स्थिती सांगितली. येथे परप्रांतीयांची वसाहत उभारली जात असून त्यासाठी उद्योगांसाठी आरक्षित जागा गिळंकृत केली जात असल्याचे स्पष्ट केले. याविषयीची सर्व वास्तव माहिती दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. सरकारी जागा कोण हडप करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या होत्या. या अतिक्रमणाकडे शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर योग्य लक्ष दिले असते तर कोट्यवधींची जमीन परप्रांतीयांच्या घशात गेली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांकडे साकडे यादवनगरमधील अतिक्रमणाच्या साम्राज्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. परंतु येथे कारवाई झालीच नाही, उलट अतिक्रमण प्रत्येक वर्षी वाढत राहिले. सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे दोघेही शिवसेनेचे नेते आहेत.
बाळासाहेबांनीही घेतली होती यादवनगरची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2016 12:59 AM