वैभव गायकरपनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीचे पडसाद नवी मुंबईमध्ये उमटले आहेत.स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते हे अनेक वर्षांपासून विमानतळाला दि.बा. यांचे नाव देण्याची मागणी करीत आले आहेत. मात्र प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दि.बा. पाटील यांनीच स्थापन केलेल्या प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची धुरा मध्यंतरी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर या समितीत फूट पडली. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सध्या सल्लागार म्हणून काम पाहणारे बबन पाटील यांना या समितीचे अध्यक्षपदी नेमले. रामशेठ ठाकूर भाजपचे नेते असल्याने महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना दूर सारले.
सध्या शिवसेनेचे निष्ठावंत व बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बबन पाटील हे या समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. मध्यंतरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात गावबैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांमध्ये जनजागृती करण्याचे चांगले काम या समितीमार्फत करण्यात आले. मात्र नुकत्याच निर्माण झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यापूर्वी वेळोवेळी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन सरकारकडे केली आहे. मात्र या समितीमार्फत नव्याने निर्माण झालेल्या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील यांना याबाबत विचारणा केली असता; नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत दोन दिवसात बैठक घेणार आहोत. या बैठकीत सर्व सदस्यांशी चर्चा केल्यावर समितीची भूमिका स्पष्ट केली जाईल असे सांगितले.
अध्यक्षांची कोंडी
स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील यांची ओळख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र म्हणून आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सेनेत कार्यरत आहेत. मात्र स्वतः स्थानिक प्रकल्पग्रस्त असल्याने प्रकल्पग्रस्तांची दि.बा. पाटील यांच्या नावाला पसंती लक्षात घेता विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून पाटील यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.समितीमार्फत नव्याने निर्माण झालेल्या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.