भार्इंदर : अहमदनगर येथील स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर जबर मानसिक धक्का बसलेले शिल्पकार प्रमोद कांबळे यांना बळ देण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी २० एप्रिलपासून आयोजित केलेल्या मीरा-भार्इंदर आर्ट फेस्टिव्हलमध्ये कांबळे यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अर्धाकृती शिल्प साकारून घेतले. आगीच्या आघातानंतर कांबळे यांनी साकारलेले ते पहिलेच शिल्प आहे. आ. सरनाईक यांनी दोन लाख ५१ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य कांबळे यांना केले.एकेकाळी भारताचे राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांनी कांबळे यांच्या शिल्पकलेला गौरवले होते. या प्रसिद्ध शिल्पकाराच्या अहमदनगर येथील स्टुडिओला काही दिवसांपूर्वी एका सफाई कामगाराच्या चुकीमुळे आग लागली होती. आगीत स्टुडिओसह त्यातील अनेक शिल्पकृती जळून खाक झाल्या. त्यात सुमारे कोट्यवधींचे नुकसान झाले. मोठ्या मेहनतीने साकारलेल्या कलाकृती आगीत नष्ट झाल्याने कांबळे यांना जबर मानसिक धक्का बसला होता. त्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्याकरिता आ. सरनाईक यांनी त्यांना मीरा-भार्इंदर आर्ट फेस्टिव्हलमध्ये निमंत्रित केले. कांबळे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अर्धाकृती शिल्प २० एप्रिलला साकारण्यास सुरुवात केली. तीन दिवसांनंतर या शिल्पकृतीला त्यांनी अंतिम स्वरूप दिले.यावेळी खा. अनिल देसाई, युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालंडे, नगरसेवक प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिल्पकार कांबळे यांनी साकारले बाळासाहेब ठाकरेंचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:53 AM