विविध उपक्रमांतून बाळासाहेबांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:15 AM2019-11-18T00:15:06+5:302019-11-18T00:15:26+5:30
जुन्या आठवणींना उजाळा; रक्तदानासह भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी आदरांंजली वाहिली. या वेळी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने लोकोपयोगी उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्या वतीने सानपाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिसरातील शिवसैनिक व इतर नागरिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच रक्तदात्यांनीही मोठ्या संख्येने शिबिराला प्रतिसाद दिला. त्यांच्याकडून जमा झालेले हे रक्त महापालिकेच्या वाशीतील रुग्णालयातील रक्तपेढीत जमा करण्यात आले.
या वेळी सुनील गव्हाणे, शिरिष पाटील, संदेश चव्हाण, अजय पवार, अतुल डेरे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाशीतील शिवाजी चौक येथे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या वतीने भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबईतील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.