चोख बंदोबस्तात मतपेट्या बालेवाडीकडे रवाना,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:57 PM2019-04-30T23:57:57+5:302019-04-30T23:58:32+5:30
पहाटेपर्यंत चालली प्रक्रिया : पनवेलमध्ये चार हजार कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश
नवी मुंबई - मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. त्याकरिता सुमारे साडेचार हजार कर्मचारी कार्यरत होते. वाड्या-वस्त्यांवरही त्यांनी काम केले. मतदानाची वेळ ६ पर्यंत असली, तरी मतपेट्या जमा करण्यास रात्री १० वाजले. त्यानंतर मंगळवारी पहाटे ४ वाजता पुणे बालेवाडीला पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. या ठिकाणी असलेल्या स्ट्राँगरूमला विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यासाठी राज्य शस्त्रधारी कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा खूप मोठा आहे. तो रायगडमधील उरण, पनवेल, कर्जत तर वरच्या भागात मावळ, चिंचवड आणि पिंपरी येथे विभागला गेला आहे. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नियंत्रण कक्ष हा निगडी प्राधिकरण पुणे येथे होता. पनवेल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांभाळली. व्ही. के. हायस्कूल येथे निवडणूक सहायक केंद्र स्थापन करण्यात आले होते. पाच लाख ३९ हजार मतदारांपैकी ५५.३० टक्के मतदान ५८४ केंद्रावर झाले. मतदान पेट्या तसेच कर्मचाऱ्यांसाठी ११६ एसटी बसेसची सेवा घेण्यात आली होती. रात्री १० वाजता मतपेट्या व्ही. के. हायस्कूल येथे जमा करण्यात आल्या. सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या देखरेखीखाली पडताळणी करण्यात आली. या सर्व प्रक्रि या पूर्ण होण्याकरिता मंगळवार पहाटेचे ४ वाजले. मतदान प्रक्रि येच्या नियोजनाकरिता गेल्या दीड महिन्यापासून सर्व यंत्रणा राबत होती. ज्येष्ठ नागरिक, विकलांग मतदारांकरिता १४ ते १७ वयोगटातील स्वयंसेवक मतदार केंद्रावर नेमण्यात आले होते. मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदार साहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला होता.
पोलिसांचा ३६ तासांचा बंदोबस्त
पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदान शांततेत व निर्भय स्वरूपात पार पडावे, यासाठी पोलिसांचा ३६ तास बंदोबस्त तैनात झाल्याची नोंद आहे. पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये ५४० स्थानिक पोलीस, एसआरपीचे ५०० जवान, २५० होमगार्डचा समावेश होता. विशेष म्हणजे, तामिळनाडू येथून १०० पोलीस आले होते, असे पनवेल विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून या मतदारसंघातील ईव्हीएम मशीन घोडबंदर कावेसर येथील न्यू होरॉईजन स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील ६ स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बुथनहाय ईव्हीएम मशीन कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. पहाटे उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालली होती. त्यानंतर कंटेनर सीआरपीएफच्या सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरॉईजन स्कूलच्या स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आले.
जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी आम्ही सेल्फी पॉइंट, सखी मतदान केंद्र स्थापन केले. त्यानंतर विकलांगांसाठी ने-आण करण्याची सोय केली होती. त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे लाभला. शांततेत मतदान पार पडले, तसेच एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता मतदान यंत्र सुरळीत चालली. माझ्या सर्व सहकाºयांनी परिश्रम घेतल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया यशस्वी झाली. - दत्तात्रेय नवले,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल