नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात, तेव्हा यामुळे कोकणात वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ आॅगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६ वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. गणेशोत्सवाच्या काळात ही वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी १६ टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान २३ आॅगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमरेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल.
गणेशोत्सवात अवजड वाहतुकीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:23 AM