लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात बुधवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत जड, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दोन्ही उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील प्रत्येक विभागात विसर्जन तलावांच्या मार्गावर मिरवणुकीतली वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
गुरुवारी अनंत चतुर्दशी निमित्ताने भक्ती भावनेने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून वाजत, गाजत विसर्जन मिरवणूक काढली जाते. यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, मिरवणुकीला अडथळा होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल केले जातात. त्यानुसार गुरुवारी पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यासाठी स्थानिक वाहतूक शाखा व स्थानिक पोलिस यांनी नियोजनबद्ध बदल केले आहेत. तसेच संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात दोन दिवसांसाठी जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगत वाहने उभी करण्यावर देखील मनाई करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, विसर्जनावेळी अडथळा होऊ नये याशिवाय ईदच्या मिरवणुकीत देखील अडथळा ठरू नये यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.
विसर्जन तलावांच्या मार्गावर मिरवणुकीचे वाहन वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय काही मार्गांवर मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेत लावण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस यांचाही बंदोबस्त राहणार आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर पालिकेकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली जाते. यामुळे त्याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देखील जमा होत असतात. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चौकाकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
दोन दिवस पोलिस ऑन ड्युटी
विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस, शीघ्र कृती दल, राखीव बल, तसेच नव्या भरतीतले पोलिस हे पुढील दोन दिवस ऑन ड्युटी राहणार आहेत. गुरुवारी दुपारपासून ते शुक्रवारी शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत आवश्यकतेनुसार बंदोबस्त असणार आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत पोलिस बंदोबस्तावर राहणार आहेत. यादरम्यान त्यांच्या अन्न, पाण्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्याकडून देखील ठिकठिकाणी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला जाणार आहे.