दिवाळीच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; नवी मुंबईत ध्वनिप्रदूषण केल्यास होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 12:21 AM2020-11-14T00:21:55+5:302020-11-14T00:22:02+5:30
पोलिसांच्या सूचना
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याच्या सूचना पोलिसांतर्फे करण्यात आल्या आहेत. यादरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. तर गर्दी जमेल अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.
राज्यासह नवी मुंबईत अद्याप कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे शासनाने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये शहरात दिवाळीनिमित्ताने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर अशा प्रकारचा कार्यक्रम कोणाला घ्यायचा असल्यास, नागरिकांची गर्दी जमणार नाही या उद्देशाने तो ऑनलाइन प्रदर्शित करावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदा कोरोनामुळे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांवर संक्रांत आली आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात निर्देशित केलेल्या प्रमाणाच्या बाहेर फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींना पूर्णपणे बरे होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. यादरम्यान त्यांना इतर कोणताही त्रास झाल्यास त्यांची प्रकृती खालावू शकते. अशातच दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या जादा आवाजाचे फटाके व धूर करणारे फटाके त्यांना त्रासदायक ठरू शकतात. शिवाय प्रदूषणाची पातळी वाढू शकते. यामुळे ज्यांना श्वसनाचे इतर आजार आहेत त्यांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे औद्योगिक, व्यापारी, निवासी आणि शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत धरून कारवाई केली जाणार आहे.
अनेकदा नागरिकांकडून उत्सव साजरा करताना त्याला वेगळेपण देण्यासाठी चायना अथवा इतर विदेशी फटाक्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र असे फटाके ध्वनी व वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे अशा विदेशी फटाक्यांचा साठा, विक्री तसेच फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे घरीच कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा करण्याच्यादेखील सूचना पोलिसांमार्फत करण्यात आल्या आहेत. तर कामानिमित्ताने घराबाहेर वावरताना मास्क व सामाजिक अंतर यांचे पालन करून स्वत:सह परिवाराचे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करण्याचेही आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.