बंदला संमिश्र प्रतिसाद, स्कूलबससह जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 02:36 AM2018-07-21T02:36:25+5:302018-07-21T02:36:43+5:30
वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नवी मुंबईसह पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नवी मुंबई, पनवेल : वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नवी मुंबईसह पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. एमआयडीसीसह स्टील मार्केटमध्ये अवजड वाहतूक बंद होती; पंरतु मुंबई कषी उत्पन्न बाजार समितीसह स्कूलबस सुरू होत्या. बंद सुरूच राहणार असून, लवकरच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारेही संपात सहभागी होणार असल्याची माहिती संपात सहभागी वाहतूकदारांनी दिली.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. त्या शिवाय मुंबई बाजार समितीच्या परिसरामध्ये ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये आहेत. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट, बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन, फेडरेशन आॅफ बॉम्बे मोटार्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन, अवजड वाहतूक सेनेसह अनेक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता. ट्रक टर्मिनलमध्ये उभे केलेले ट्रक दिवसभर हलू दिले नव्हते. ट्रान्सपोर्ट कंपन्यांनीही वाहनांमध्ये माल भरला नाही. या संपात कळंबोली-तळोजा ट्रान्सपोर्टस अॅण्ड क्रेन्स ओनर्स असोसिएशन या संघटनेने सहभाग घेतल्याने कळंबोली स्टील मार्केटमधील सुमारे पाच हजार वाहने या वेळी बंद होती. कळंबोली शहरातील वाहतूक संघटना सहभागी झाल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प होते. कळंबोली-तळोजा ट्रान्सपोर्ट अॅण्ड क्रेन्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल नाईक यांचादेखील सहभाग होता. वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी दिवसभर शहरात फिरून सर्वांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.
संपाच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक वस्तूच्या व्यापाराला वगळण्यात आले होते, यामुळे मुंबई व परिसरातील अन्नधान्य, दूध पुरवठा सुरळीत होता. बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये ६४२ ट्रक, टेम्पोंची आवक झाली होती. धान्य मार्केटमध्ये आवक कमी झाली असून, इतर सर्व मार्केटमधील आवक सुरळीत होती. बाजार समितीमधून मुंबईमध्ये जाणाऱ्या वाहतुकीवर संपाचा परिणाम झाला होता. गुरुवारच्या तुलनेमध्ये २२१ कमी वाहने मार्केटच्या बाहेर पडल्याची नोंद झाली आहे. संपाविषयी स्कूलबस संघटनांना वेळेत निरोप देण्यात आला नाही. स्कूलबस चालकांना शाळा व्यवस्थापनांना वेळेवर सांगता न आल्यामुळे नवी मुंबईमधील स्कूलबसची वाहतूक दिवसभर सुरळीत सुरू होती. शनिवारी बंदला प्रतिसाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
>बाजार समितीमधील आवक-जावकचा तपशील
मार्केट आवक जावक
कांदा- बटाटा ३०६ १७८
भाजीपाला ६३२ ६३६
फळ मार्केट ३९२ ४०८
मसाला १६१ ६१
धान्य २३८ ३५
प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये नवी मुंबईमधील वाहतूकदारांनीही सहभाग घेतला होता. अवजड वाहतूक दिवसभर बंद होती. पहिल्या दिवशी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांना बंदमधून वगळले होते. हे आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.
- नरेश चाळके, सचिव, फेडरेशन आॅफ बॉम्बे मोटार्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन