नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 28, 2024 06:55 PM2024-04-28T18:55:34+5:302024-04-28T18:55:46+5:30
बनावट कागदपत्राद्वारे मिळवला आश्रय
नवी मुंबई : १७ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी कुटुंबावर नेरुळ पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नेरूळमध्ये आश्रय मिळवला होता. पती, पत्नी व दोन मुले अशा चौघांचा यामध्ये समावेश आहे.
नेरुळ परिसरात काही बांग्लादेशी व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पोलिसांकडून परिसरातील संशयित नागरिकांची चाचपणी सुरु होती. त्यामध्ये सेक्टर १५ येथील एनएल २ वसाहतीमध्ये एका कुटुंबाची पाहणी करण्यात आली. यावेळी एका व्यक्तीने पोलिसांना दाखवलेल्या कागदपत्रांवर संशय आला. त्यामुळे कुटुंबाची कागदपत्रे तपासणी केली असता ते मूळचे बांग्लादेशी असून भारतात घुसखोरी करून आले असल्याचे समोर आले. त्यानुसार अब्दुल शेख (५५), तेहमीना शेख (४२), हलीमा शेख यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात आल्यावर त्यांना मुलगा देखील झाला असून तो १२ वर्षाचा आहे. त्याला देखील पोलिस कुटुंबियांसोबत बांग्लादेश येथे पाठवणार आहेत.
नेरुळ परिसरातील एका कुटुंबाकडे तेहमीना हि १० वर्षांपासून घरकाम करत आहे. तर अब्दुल हा देखील परिसरात मिळेल ते काम करतो. मागील दहा वर्षात त्यांनी नेरुळ परिसरात ठिकठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्य केले आहे. गावठाणांमध्ये कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता भाड्याने घर मिळवून ते राहत होते. २००८ मध्ये हे कुटुंब घुसखोरी करून भारतात आले आहे. तेंव्हापासून मागील १७ वर्षे ते पोलिसांची नजर चुकवून भारतात वास्तव्य करत होते. दरम्यान त्यांच्या संपर्कात भारतातील इतरही घुसखोर बांग्लादेशी आहेत का याचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत.